आमच्याबद्दल
दरेकरवाडी गावाची माहिती
उत्तर दिशेला औद्योगिक क्षेत्र आणि दक्षिणेला बारमाही वाहणारी भीमा नदी, या दोन्हींच्या मध्ये वसलेले एक छोटेसे, निसर्गरम्य आणि शेतीप्रधान गाव म्हणजे दरेकरवाडी.सन १९८० मध्ये धानोरे गावापासून विभक्त होऊन दरेकरवाडी गावाने स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आणि प्रगतीच्या दिशेने एक नवे पाऊल टाकले. गावातील जागृत देवस्थान श्री घनोबा महाराज तसेच ग्रामदैवत दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिर यांच्या कृपेने आणि आशीर्वादाने दरेकरवाडी गावाची दिवसेंदिवस प्रगती होत आहे.
दरेकरवाडीचा मुख्य व्यवसाय शेती हा असला, तरी आज गावातील अनेक तरुण उच्च शिक्षण घेऊन विविध व्यावसायिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देत आहेत. गावात एक सुसज्ज व सुंदर जिल्हा परिषद शाळा आहे. तसेच धानोरे आणि दरेकरवाडी या दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्नांतून माध्यमिक विद्यालय सुरू केले असून, दोन्ही गावांतील विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. या शैक्षणिक संस्थांमधून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची भक्कम पायाभरणी होत आहे.
धार्मिक व सांस्कृतिक परंपरा
गावातील विविध सण-उत्सवांच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन श्री घनोबा महाराजांचा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करतात.तसेच श्री दत्त जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो. सन २००९ पासून दरेकरवाडी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जात असून, ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने या सोहळ्यात सहभागी होतात.
याशिवाय “एक गाव, एक शिवजयंती” या संकल्पनेतून शिवजयंती उत्सव तसेच गणेशोत्सवही सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरे करतात. या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांमुळे गावातील सामाजिक एकोपा अधिक दृढ होत आहे.
शेती व आर्थिक विकास
शेतकऱ्यांच्या विकासासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या धानोरे-दरेकरवाडी विकास कार्यकारी सोसायटी तसेच दरेकरवाडी विकास सोसायटी यांच्या माध्यमातून आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. त्यातून शेती उत्पादन वाढीस चालना मिळत असून, शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधण्यास मदत होत आहे.शेतीसोबतच विविध शेतीपूरक व्यवसायांचाही मोठ्या प्रमाणावर विकास होत असून, त्यातून गावातील रोजगाराच्या संधी वाढत आहेत.
ग्रामविकास व सामाजिक उपक्रम
दरेकरवाडी ग्रामपंचायत, विविध सार्वजनिक मंडळे आणि ज्येष्ठ ग्रामस्थ यांच्या सहकार्याने गावात विविध विकास योजना तसेच आरोग्य, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.दरेकरवाडी ग्रामपंचायतीच्या अत्याधुनिक इमारतीसाठी स्व. बबन (नाना) महादू दरेकर यांनी स्वतःची जागा देऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या या योगदानाबद्दल ग्रामस्थांच्या मनात सदैव कृतज्ञता राहील.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सन्माननीय खासदार, आमदार, प्रतिष्ठित मान्यवर, सरपंच, उपसरपंच, विविध कंपन्यांचा CSR निधी तसेच ग्रामस्थांचे मोलाचे योगदान आणि सहकार्य लाभले आहे. या सामूहिक प्रयत्नांतून गावात सुंदर रस्ते, पाणीपुरवठा योजना, वीज व्यवस्था आणि आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
धार्मिक व सामाजिक वास्तूंची उभारणी
ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांतून श्री जय हनुमान मंदिराचे भव्य बांधकाम पूर्ण झाले आहे. तसेच पंढरपूर येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य धर्मशाळेचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. या दोन्ही उपक्रमांतून ग्रामस्थांची एकजूट, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित होते.
एक आदर्श गाव घडविण्याचा संकल्प
“आपले गाव, आपली जबाबदारी” या संकल्पनेतून दरेकरवाडीतील ज्येष्ठ ग्रामस्थांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ घेत, तरुण पिढी आणि सर्व ग्रामस्थ एकोप्याने गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत.
ज्येष्ठांचे मार्गदर्शन, तरुणांची ऊर्जा आणि ग्रामस्थांची एकजूट यांच्या बळावर दरेकरवाडीला एक आदर्श, परिपूर्ण, स्वच्छ, सुंदर आणि प्रगत गाव तसेच एक सुसंवादी कुटुंब बनविण्याचा संकल्प सर्व ग्रामस्थांनी केला आहे.
एकजूट, संस्कार, विकास आणि प्रगती यांची वाटचाल अशीच अखंड सुरू राहो, हीच श्री घनोबा महाराज आणि श्री हनुमान चरणी प्रार्थना!
0
पर्यटक प्रती वर्ष
0
तालुका व जिल्हास्तरीय पुरस्कार
0
पुरस्कार राज्य पातळी
0
पुरस्कार केंद्र सरकार
दृष्टी (Vision)
दरेकरवाडी गावाचा सर्वांगीण, शाश्वत आणि लोकसहभागातून विकास घडवून आणणे. स्वच्छता, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि आधुनिक नागरी सुविधांच्या माध्यमातून गावाला आदर्श, सक्षम आणि आत्मनिर्भर ग्रामपंचायत म्हणून विकसित करणे.
ध्येय (Mission)
ध्येय (Mission) दरेकरवाडी गावातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, ग्रामपंचायत प्रशासन पारदर्शक व लोकाभिमुख ठेवणे आणि स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पाणी व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन व रोजगारवाढीसाठी प्रभावी उपक्रम राबवणे.